Sunday, November 18, 2012

दादरमध्ये लोटला अभूतपूर्व जनसागर

मुंबई

दादरमध्ये लोटला अभूतपूर्व जनसागर

http://www.loksatta.com/mumbai-news/huge-crowd-gathered-to-pay-last-respect-to-sena-supremo-bal-thackeray-11516/


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दादरच्या शिवसेना भवनाजवळील परिसर शिवसैनिकांच्या अभूतपूर्व अशा गर्दीने फुलून गेला आहे. बाळासाहेबांच्या सभा, त्यांची भाषणे यांच्या आठवणी आळवत दादर स्थानकापासून जथ्याजथ्याने शिवसैनिक शिवतीर्थाची वाट चालत आहेत.
यात आबालवृद्धांपासून लहानांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील शिवसैनिकांचा समावेश होता हे विशेष. शिवसेना भवनाच्या बाजूने शिवाजी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील रहदारी बंद करण्यात आल्याने शिवसैनिकांना अन्य मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे एरवी निरव शांततेत बुडालेल्या दादरच्या लहानमोठय़ा गल्ल्याही माणसांनी भरून गेलेल्या दिसत आहेत.
अंत्ययात्रा लांबल्याने थकल्याभागल्या शिवसैनिकांनी बंद दुकानांच्या पायऱ्यांवर आसरा घेत आहेत. शिवसेना भवनापासून दादर स्थानकापर्यंतच्या सर्व दुकानांबाहेर शिवसैनिक विसावलेले पहावयास मिळत आहेत.
वर्तमानपत्र वगळता कुठल्याही वस्तूची विक्री या भागात होताना दिसत नाहिए. वर्तमानपत्रांनाही चांगली मागणी आहे. वेळ घालविण्यासाठी शिवसैनिक मिळेल ते वर्तमानपत्र विकत घेऊन वाचत आहे. बाळासाहेबांशी संबंधित पुस्तकांच्या विक्रीलाही या वेळी जोर आलेला पहायला मिळत आहे. दिवाळी अंकांबरोबर ही पुस्तकेही वर्तमानपत्र विक्रेत्यांनी ठेवली आहेत. पक्षभेद विसरून विविध पक्षांच्या नेत्यांनी ठिकठिकाणी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहणारे लावलेले फलकही आकर्षून घेत होते.
या परिसरात साधी टपरीही उघडी नसल्याने शिवसैनिकांसाठी ठिकठिकाणी पाणी, चहा आणि नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. साधा बिस्किटाचा पुडा मिळतानाही मारामार असल्याने प्लॅस्टिकच्या ग्लासातून मिळणारा घोटभर चहाही अर्मुततुल्य वाटत असावा. शिवसैनिक रांगा लावून चहा पित आहेत. या भागातील लहानमोठय़ा हॉटेलांबाहेरही पाण्याची सोय करण्यात आली आहे. नाश्ता म्हणून पुलाव, पोहे अशी सोयही करण्यात आली आहे. शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क परिसरातील इमारतींवरही लोकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.

No comments:

Post a Comment