Thursday, October 31, 2013

वॉलमार्टचे लॉबिंग पुन्हा सुरू

वॉलमार्टचे लॉबिंग पुन्हा सुरू

walmart.jpg

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन 

मल्टीरिटेल कंपनी वॉलमार्टने भारतातील व्यवसाय वाढवण्यासाठी अमेरिकेत पुन्हा लॉबिंग सुरू केले असून गेल्या तिमाहीत १५ लाख डॉलर्स खर्च केले आहेत. या संदर्भात वॉलमार्टने अमेरिकन सिनेटला सादर केलेल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. 

भारतातील एफडीआयवरील निर्बंध कमी व्हावेत यादृष्टीने ५० महत्त्वाचे मुद्दे वॉलमार्टने अमेरिकेतील काँग्रेस सदस्यांपुढे मांडले आहेत. अमेरिकेत लॉबिंग करणे कायदेशीर असले तरी त्यासाठी काय आणि किती निधी खर्च केला त्याचा तपशील लॉबिंग करणाऱ्या कंपनीला देणे बंधनकारक आहे. 

गेल्या वर्षी वॉलमार्टच्या लॉबिंगमुळे भारतात खळबळ माजली होती आणि त्यासंदर्भात केंद्र सरकारने चौकशीही सुरू केल्यानंतर वॉलमार्टने अमेरिकेतील हे लॉबिंग बंद केले होते मात्र, ते आता पुन्हा सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या महिन्यात वॉलमार्टने भारतीय पार्टनर भारती एन्टरप्रायझेसशी काडीमोड घेतला असून ‌देशातील रिटेल क्षेत्रात स्वंतत्रपणे वाटचाल करण्याचे ठरवले असल्याने वॉलमार्टच्या लॉबिंगला महत्त्व आले आहे. एफडीआय तसेच, मल्टीरिटेल क्षेत्रातील बंधने शिथिल करावीत, अशी मागणी वॉलमार्टने सातत्याने केली आहे. 

टाटांचे लॉबिंग 

अमेरिकेतील इमिग्रेशन कायद्यातील सुधारणा, तांत्रिक शिक्षणाचा मुद्दा अशा भारतीय कंपन्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांवर दोन वर्षांनंतर टाटांच्या कंपन्यांनीही लॉबिंग केले असून त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. भारतीय कंपन्याही अमेरिकेत लॉबिंग करत असतात. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीही लॉबिंग करीत असे मात्र, गेल्या वर्षी कंपनीने त्यासंदर्भातील अमेरिकेच्या कायद्यानुसार गरजेची असणारी नोंदणी करणे थांबवले. नॅसकॉम, ओएनजीसी विदेश अशा काही कंपन्यांनी नोंदणी करणे सुरू ठेवले आहे.

No comments:

Post a Comment