Monday, March 11, 2013

‘नजर’ बदला.. अगर नष्ट व्हा !

'नजर' बदला.. अगर नष्ट व्हा !


जागतिक महिला दिन यंदाही धूमधडाक्यात साजरा होणार.. कारण आता त्याचा इव्हेंट झाला आहे. महिला दिन साजरा होण्याच्या प्रमाणात प्रतिवर्षी वाढच होत आहे. त्या निमित्ताने साजरे होणारे कार्यक्रम सातत्याने वाढत आहेत. आता तर जवळपास सर्वच राजकीय पक्ष आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या महिला दिवसाच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यातही सौंदर्यप्रसाधने आणि ज्या उत्पादनांचा ग्राहकवर्ग हा प्रामुख्याने महिला आहेत, अशा उत्पादक कंपन्या महिलांसाठी नानाविध प्रकारच्या स्पर्धा आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. महिला, तरुण मुली यांच्यावर बक्षिसे, पुरस्कार, शिष्यवृत्त्या यांची खैरात करतात. एरवी राजकीय पटलावर महिला आरक्षणाला कडाडून विरोध करणारे राजकीय पक्षही या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये आघाडीवर असतात. आपण सारे असे गृहीत धरतो की, महिलांच्या हक्कांविषयी जाणीवजागृती करण्यात आपल्याला यश आले आहे. पण हे कितपत खरे असते?
अगदीच उदाहरण घ्यायचे तर बालदिन आणि महिला दिन या दोन्ही दिवशी आपल्याकडे वर्तमानपत्रांमध्ये हमखास एक विशिष्ट प्रकारचे छायाचित्र पाहायला मिळते. यात लहान मुले ज्यांना बालदिन म्हणजे काय याची नेमकी कल्पना नाही ती रस्त्यावर त्यांचे नियमित जीवन जगत असतात किंवा मग गावाकडच्या महिला काहीतरी काम करताना नजरेस पडतात या छायाचित्रांमधून. वीटभट्टीवर काम करणारी लहान मुलगी किंवा मग रस्त्यावर खेळणी विकणारी लहान मुलगी त्या छायाचित्रात दिसत असते. थेट हृदयाला भिडतील अशा फोटो ओळी त्याखाली लिहिलेल्या असतात. आपणही क्षणभर हेलावून जातो, महिला दिनाला साजेसे काहीतरी पाहिल्याचे आणि हेलावल्याने आपले भावनिक कर्तव्य पार पाडल्याचे समाधान आपल्याला मिळते. जागतिक महिला दिन नावाचे काही आपल्यासाठी साजरे होते आहे, याची साधी कल्पनाही या छायाचित्रातील मुलीला नाही, असेच काहीसे त्याखाली लिहिलेले असते.. पण मग महिला दिन साजरा करण्याकरिता फोटो टिपताना त्या छायाचित्रकाराला याची जाणीव नसते का? त्या मुलीला असे काही ठावूक नाही, इथपत ठीक आहे. पण मग छायाचित्र टिपल्यानंतर 'असे काही असते' हे त्या मुलीला सांगावेसे आपल्याला का नाही वाटत? या बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा मग महिलांसाठी खास उत्पादने विकसित करणाऱ्या कंपन्या केवळ शहरी महिलांना समोर ठेवूनच तो दिवस का साजरा करतात? त्या एका दिवसासाठी आपला नफा बाजूला सारून आपण इतर ग्राहक नसलेल्या महिलांसाठी काम करावे, असे त्यांना केव्हा वाटणार?
खरे तर या सर्व गोष्टींना आपणच कारण आहोत. कारण हे सारे आपण खपवून घेतो. पुढील वर्षांपासून या बहुराष्ट्रीय कंपन्यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत आपल्या नफ्यातील काही वाटा समाजाप्रती खर्च करावा लागेल, त्या वेळेसही या महिला दिनाशी संबंधित बाबींचा समावेश त्यात केला जाण्याची शक्यता आहे. कारण यात ग्राहकवर्ग आणि समाजकारण अशा दोन्हींचा समावेश शिताफीने केला जाऊ शकतो. अर्थात या साऱ्या बाबींमुळे महिला दिन साजरा करूच नये, असे कुणीही म्हणणार नाही. मात्र तो साजरा करताना आपल्याला समाजातील बदलते नित्य नवे भान मात्र ठेवावे लागणार आहे.
खास करून भारतासारख्या देशात हा महिला दिन साजरा करताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कारण आपल्याकडे महिलांमध्येच असलेली विषमतेची दरी अमाप आहे. म्हणजेच काही अब्ज रुपयांचे निर्णय घेणाऱ्या चंदा कोचरही आपल्याकडे आहेत आणि नैना लाल किडवाईही आहेत. दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागेल, असे निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अर्थव्यवस्थेचे भान जराही सुटून चालत नाही. त्या जबाबदाऱ्या या महिला काटेकोरपणे पार पाडताना दिसतात. त्या महिला आहेत, याने निर्णयप्रक्रियेत कुठेही फरक पडत नाही. िलगभेदाची भावना कुठेही अस्तित्वात नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनह्ण हा शब्दप्रयोग केवळ प्रत्यक्षात आलेला दिसतो. अगदीच खरे सांगायचे तर या महिला पुरुषांपेक्षा दोन नव्हे तर चार पावले पुढे आहेत. 
पण हा तोच समाज आहे की, जिथे आजही व्यवसायाने डॉक्टर असलेली उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित महिला स्त्रीभ्रूण हत्येला विरोध करण्याची क्षमता राखत नाही. याच समाजात अशा अनेक महिला आहेत की, ज्यांना दैनंदिन जीणेही मध्ययुगात असल्याप्रमाणे जगावे लागते. केवळ कुटुंबाकडून केला जाणारा नव्हे तर समाजाकडून केल्या जाणाऱ्या अत्याचारांना रोजसामोरे जावे लागते. मुळात आपण जे सहन करतोय, तो अन्याय आहे, याचीही जाणीव नाही. एकाच समाजाची ही दोन टोके आहेत. एकाच वेळेस अशा महिलांसाठी जाणीवजागृतीची चळवळ आणि दुसरीकडे िलगभेद मिटावा म्हणून चळवळ सुरू आहे. काम, व्यवसाय आणि करिअरच्या बाबतीत लिंगभेद नको म्हणून महिला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. आणि कामाच्या ठिकाणी महिला म्हणून समाजाने समजावून घ्यावे म्हणूनही विशेष सवलतींसाठी मागणी होते आहे. आपले सारे पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार केला तर असे लक्षात येईल, या दोन्ही प्रकरणांमध्ये दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी केलेल्या मागण्या या त्या त्या परिस्थितीत वावरणाऱ्या त्यांच्या गरजाच आहेत. त्या दोन्हींना एकच एक फुटपट्टी लावून चालणार नाही. पण त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनी हेही लक्षात घ्यायला हवे की, भविष्यात मात्र या साऱ्यांना एकाच फुटपट्टीवर यायचे आहे. अशा अनेक विषमस्तर असलेल्या एका समाजाचा आपण सारे जण भाग आहोत. त्यामुळे प्रत्येक पाऊल उचलताना आजचा कमी आणि भविष्याचा अधिक विचार करावा लागणार आहे. कारण आपल्या सर्वाचा प्रवास हा खऱ्या अर्थाने लिंगभेदविरहित समाजाच्या दिशेने व्हायला हवा. ते खऱ्या प्रगतीचे निदर्शक असेल. 
खरे तर पूर्वी कधीही नव्हे अशा प्रगतीच्या किंवा कदाचित उत्क्रांतीच्या एका वेगळ्या अनवट वळणावर आपण उभे आहोत. आणखी काहीशे वर्षांमध्ये अशी एक अवस्था महिलांना प्राप्त होणार आहे की, त्यामुळे फक्त त्यांच्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण जगाची परिमाणे बदलून जातील. कारण कदाचित त्यानंतर त्यांना प्रजोत्पादनासाठी पुरुषांची गरजच भासणार नाही. मानवी उत्क्रांतीमधील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा असेल. असा टप्पा की ज्याचा सर्वाधिक परिणाम समाजरचनेवर होईल आणि नवीन परिमाणांना साजेशी एक नवी समाजरचना अस्तित्वात येण्याची शक्यता असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे स्वप्नरंजन नाही, तर हे वैज्ञानिक वास्तव आहे. 
खरे तर याला एक खूप मोठी पाश्र्वभूमी आहे, मानवी इतिहासाची आणि उत्क्रांतीचीही. या भूतलावर सर्वप्रथम प्रकृती आणि पुरुष अस्तित्वात आले, म्हणजेच अ‍ॅडम आणि इव्ह अस्तित्वात आले आणि त्यांच्या एकत्र येण्यातून नंतर संपूर्ण मानवजात निर्माण झाली, असे एक मिथक आहे. मात्र ते केवळ मिथकच आहे, हे संशोधनाअंती वैज्ञानिकांना लक्षात आले. मानववंशशास्त्राने या साऱ्याचा वैज्ञानिक अभ्यास केला. मागच्या पिढय़ांमध्ये जाताना एका ठिकाणी असे लक्षात आले की, पुरुष नावाची प्रजाती अस्तित्वातच नव्हती. त्या वेळेस केवळ स्त्रीच या भूतलावर होती आणि तिच्याच पेशीविभाजनामधून तेव्हा प्रजोत्पादन होत होते. मानववंशशास्त्रामध्ये हे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेले सत्य आहे. स्त्रीच्या जनुकामध्ये निर्माण झालेल्या विकृतीमधून पुरुष अस्तित्वात आला, असा संशोधकांचा रास्त कयास आहे. त्याचाही वैज्ञानिक शोध सुरू आहे. हाती नंतर काहीही आले तरी एक बाब पुरेशी स्पष्ट आहे ती म्हणजे स्त्री हीच भूतलावरची आपली मूळमाया किंवा आदिमाया आहे. 
आता डॉ. आरती प्रसाद नावाच्या एका भारतीय वंशाच्या युवतीने एक नवीन सिद्धांत मांडला असून सध्या त्याची चर्चा जगभरात सुरू आहे. त्यावर तिने लिहिलेले 'लाइक अ व्हर्जिन : सायन्स ऑफ अ सेक्सलेस फ्यूचर' हे पुस्तक जगभर गाजते आहे. आरतीने लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजमधून 'मॅमलिअन सेल सायकल बायॉलॉजी' या विषयात पीएच.डी. केली आहे. त्याच तिच्या संशोधनावर हे पुस्तक आधारलेले आहे. महिलांमधील अस्थिमज्जेतील पेशी आणि मूलपेशी यांचा संकर घडवून आणल्यास पुरुषासोबतच्या समागमाशिवाय अपत्यप्राप्ती शक्य आहे, असे हे संशोधन सांगते. त्याला वैज्ञानिक आधार आहे. अगदी लगेच म्हणजे येत्या १०-१२ वर्षांमध्ये नव्हे, पण शे-दीडशे वर्षांमध्ये हे प्रत्यक्षात आलेले पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. मग पुरुषांची गरज खरोखरच संपलेली असेल का? हा यक्षप्रश्नच आहे. पण पुरुषांच्या दृष्टीने एक चांगली महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे उत्तर आपल्याला आताच ठावूक आहे, ते म्हणजे आपले अस्तित्व नंतरही कायम राखायचे असेल तर केवळ महिला किंवा स्त्री आणि आपल्याशिवाय तिला काही गत्यंतर नाही, या नजरेतून पाहणे सोडून द्यायला हवे. स्त्री किंवा महिलांना लैंगिकतेच्या पलीकडे जाऊन समजून घ्यायला हवे आणि त्याप्रमाणे आपले वागणे बदलायला हवे.. अन्यथा डार्विन सांगून गेलाय ते लक्षात ठेवायला हवे.. ज्याची गरज संपते ते नष्ट होते !

vinayak.parab@expressindia.com

No comments:

Post a Comment