Sunday, June 16, 2013

कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अजित पवारांवर हल्ला सिंचन आणि वीज क्षेत्रातलं अपयश कोण स्वीकारणार


कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अजित पवारांवर हल्ला
सिंचन आणि वीज क्षेत्रातलं अपयश कोण स्वीकारणार

राज्यातल्या कृषी खात्याला केंद्राकडून योग्य प्रमाणात निधी मिळतो, पण शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या ह्या खात्याकडे राज्य सरकारची दृष्टी मात्र नकारात्मक असल्याची उघड टीका करत कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात सिंचन आणि वीज क्षेत्रात झालेल्या पीछेहाटीचा मुद्दा उचलत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टीकेचं लक्ष्य केलंय.
जय महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक रवींद्र आंबेकर यांना दिलेल्या खास मुलाखतीत विखे पाटील यांनी अजित पवारांशी आपले मतभेद असल्याचं मान्य केलंय. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीशी केवळ मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मुकाबला करणं शक्य झालं, मात्र ज्यामुळे ही स्थिती निर्माण झाली त्याची कारणमिमांसा आपण करणार आहोत की नाही असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलाय. सिंचनावर आता पर्यंत झालेला खर्च वाया गेल्यामुळे यापुढे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारे ८० हजार कोटी कृषी खात्याला द्या आम्ही १० लाख हेक्टर ची सिंचन क्षमता दोन वर्षांत करून दाखवतो असं आव्हान ही विखे पाटील यांनी दिलंय.
कृषी विभाग पुस्तक काढण्यात दंग
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना कृषी विभाग मात्र समाधानकारक काम करू शकला नाही. एकही आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेऊन कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट आत्महत्याग्रस्त भागासाठी काय केलं असं विचारल्यावर पुस्तक काढलं असं उत्तर कृषी अधिकाऱ्यांनी दिलं. पुस्तक काढणं हे आपलं काम नाही. आपण गावं दत्तक घेऊन काम सुरू करा असे आदेश आपण कृषी अधिकाऱ्यांना दिलेयत, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी जय महाराष्ट्र शी बोलताना सांगीतलं.
कृषी विभागानं पुरेसं संशोधन केलं नाही, म्हणून शेती क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींना मोकळं रान मिळालं अशी कबूली विखे पाटलांनी दिलीय. कृषी विभागाकडे एकही सक्सेस स्टोरी नाहीए. राज्य सरकार शेती साठी स्वतंत्र बजेट ही ठेवत नाही, असं कसं चालेल. कृषी क्षेत्राला प्राथमिकता नाहीए असं खेदानं मान्य करत कृषी खात्याला स्वतंत्र बजेट न ठेवण्यामागचं लॉजीक आपल्याला समजलं नसल्याचं विखे पाटील यांनी सांगीतलंय.
खतांच्या काळाबाजारात हितसंबंध-
यंदा बांधावर खत योजनेमुळे खताची मागणी ३० टक्क्यांनी कमी होईल, आणि शेतकरी खताची साठवणूक करणार नाही अशी खात्री विखे पाटील यांना वाटतेय. मात्र इम्पोर्ट केलेले खत पुन्हा एक्स्पोर्ट करण्यात आल्याच्या काही घटना समोर आल्या असून त्याची चौकशी सुरू आहे. बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार ह्या मागे कुणाचे हितसंबंध आहेत असा सवाल ही विखेंनी विचारलाय.
पाणी कुठं मुरतंय –
सिंचनावरून जो वाद निर्माण झाला त्याची चौकशी करण्याकरिता नेमलेल्या चितळे समितीला अधिकारच नाहीत. मोठ्या प्रकल्पांचा अट्टाहास का, धरणांच्या किंमती का वाढतात. सिंचन क्षमता का निर्माण होऊ शकली नाही, शहरी लोकवस्तीला पाणी लागणार आहे याचं नियोजन का करण्यात आलं नाही, मावळ मध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार का झाला... तुम्ही बंदुकीच्या गोळीच्या बळाबर राज्य करू पाहताय का असा खडा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलाय. शेतकऱ्यांच्या पाण्यावर कोण डल्ला मारतंय...शेतीचं पाणी इंडिया बुल्स ला कोणी वळवलं.. असा सवाल विचारत विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कांग्रेस कडे असलेल्या खात्यांच्या कारभारावर टीका केलीय. पाणी कुठं मुरतंय ह्याचा शोध घ्यायला हवा असं मतही विखे पाटलांनी व्यक्त केलंय.
अजित पवारांशी वाद –
केंद्रीय कृषी खात्यानं राज्याला चांगली मदत केलीय पण अजित पवारांशी आपले वाद असल्याची कबूली विखे पाटील यांनी दिलीय. मुळा – प्रवरा संस्थेवरची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होती. वीज नियामक आयोग ही काही स्वायत्त संस्था नाहीय. ती आपल्या राजकीय मालकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांच्या कडून न्यायाची अपेक्षा नाही. दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न आहे. सामान्य माणूस नाडला गेलाय. त्यामुळे तो आवाज उचलू शकत नाही. ट्रान्सफॉर्मर, डीपी फ्यूज बदण्यासाठी पैसे द्यावे लागतात. हे कुणी पाहणार आहे की नाही. लोडशेडींग संपलंय असा दावा आहे, मी महाराष्ट्रात फिरतो पण मला तसं वाटत नाही. जे १५-१६ तास आपण वीज देतो ती नीट आहे का हे पाह्यलं पाहिजे.
वीज मंडळानं विविध कामांची कंत्राटं कुणा-कुणाला दिलीयत, त्यांच्याशी काय हितसंबंध आहेत हे पाह्यला पाहिजे असं मत ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय.

सिंचन, वीज, नियोजन ह्या सर्वच क्षेत्रातली कामगिरी समाधानकारक नसून नेते म्हणून जबाबदारी स्वीकारणार की नाही असा सवाल ही विखे पाटील यांनी केलाय.
ही संपूर्ण मुलाखत रविवारी संध्याकाळी 7:30, रात्री ११:30 आणि सोमवारी सकाळी ११:30 वाजता जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलवरून प्रसारित होणार आहे.

No comments:

Post a Comment